सैराट आल्यानंतर आपल्या सगळ्यांना वाटलं कि आरची आणि परश्या सोबत जे झालं ते खूप चुकीचं होतं. पण थेटर मधून बाहेर पडल्यानंतर जात आणि धर्म पुन्हा आपल्या मनावर आरूढ झालेत . आजही भारतात सारख्या जातीत आणि धर्मात लग्न लावून देण्याचं प्रमाण खूप आहे. आपला हट्ट असतो तो. दुसऱ्या जातीत किंवा धर्मात लग्नं केलं तर समाजातून बहिष्कृत केलं जातं अनेकांना .
संविधानाच्या पहिल्या पानावर भारतीय समाज कसा असायला हवा याचा संदर्भ दिलेला आहे. त्याला आपण प्रास्ताविक म्हणतो. मग त्यात अनेक गोष्टी दिल्या आहेत . त्यात न्याय , स्वातंत्र्य , समता आणि बंधुता या ४ गोष्टी प्रवर्धित करण्याचा संकल्प करतोय असा म्हटलंय. ७० वर्ष उलटून गेलीत . पण भारतीय समाज आजही जातीयवादाच्या विळख्यातून बाहेर पडलेला नाही. धार्मिक आणि जातीय ध्रुवीकरण प्रचंड प्रमाणात वाढलंय. आज आपण आपला नेता जात आणि धर्म पाहून निवडतो. आपण अशा टोकावर येऊन पोहोचलोय जिथे नेत्याला विरोध करणं म्हणजे धर्माला विरोध करणं,आणि धर्माला विरोध करणं म्हणजेच देशाला विरोध करणं झालंय. धार्मिक आणि जातीयवादी कत्तली आपल्याला रोजच्याच वाटायला लागल्यात. आपण दगडाहूनही कठोर आणि निर्दयी झालोय. इतके निर्दयी कि दगडाच्या देवावरून कत्तली करण्यासाठी आपण पुन्हा दगडाचाच वापर करतोय.
बाहेरच्या जातीत/ धर्मात लग्न केल्या मूळे अनेक तरुण जोडप्यांना जीव गमवावा लागलाय. आणि हे फक्त ग्रामीण भागात आणि अशिक्षितांमध्ये होतंय असं नाहीए, शहरी भागात हि हे प्रमाण अधिक आहे. पंतप्रधान मोदींच्या नवीन भारताची संकल्पना त्यांनी कधी उघड उघड सांगितली नाही पण जेव्हा एक केंद्रीय मंत्री मॉब लिंचिंग सारख्या भयंकर गुन्ह्यातून जामिनावर सुटलेल्या गुन्हेगारांचा हार घालून सत्कार करतात ,तेव्हा नवा भारत कसा असेल याचं चित्र स्पष्ट दिसतं. हे फक्त एक उदाहरण आहे. अशी अनेक उदाहरण आहेत जेव्हा संविधानाची पायमल्ली केली गेली. जातीयवाद - मॉब लिंचिंग - धार्मिक ध्रुवीकरण - राजकारण या चारही गोष्टी घट्ट जुळलेल्या आहेत म्हणून त्या एकत्रित रित्याच बघितल्या जायला हव्यात . या सगळ्यातून आपण एक निर्लज्ज आणि अमानुष समाज पुढच्या पिढीला देत आहोत. माणूस म्हणून आपण अपयशी ठरलोय.
Comments
Post a Comment